- डॉ. वसंत भोसलेबंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे.
काँग्रेस पक्षाने आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका चिक्कोडी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल बेळगावमधून तर बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंदारे यांचा मुलगा सागर बिदरमधून, दक्षिण बंगळुरु मतदारसंघातून रामलिंगा रेड्डी यांची कन्या सोम्या रेड्डी, बागलकोटमधून मंत्री शिवानंद पाटील यांची कन्या संयुक्ता निवडणूक रिंगणात आहेत. दावणगेरेमधून मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार प्रभा मल्लिकार्जुन निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे सासरे शामनूर शिवशंकराप्पा हे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. राज्यसभेचे माजी उपसभापती के. रहमान खान यांचे चिरंजीव मन्सूर अली खान मध्य बंगळुरुमधून निवडणूक लढवत आहेत.
तीन माजी मुख्यमंत्री रिंगणातजनता दलाचे कुमार स्वामी मंडयामधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे बसवराज बोम्मई हावेरी मतदारसंघातून तर जगदीश शेट्टर बेळगावमधून निवडणूक रिंगणात आहेत.
खरगे यांच्या जावयाला तिकीट सर्वच पक्षांनी घराणेशाहीचाच मार्ग पत्करला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून जावई राधाकृष्ण दोडमनी यांना उमेदवारी दिली आहे.
मर्जी राखण्यासाठी नातलगांना दिले तिकीट- भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने या निवडणुकीत आघाडी केली आहे. माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी मंड्यामधून तर त्यांचे पुतणे प्रज्वल रेवण्णा हसन मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. - देवेगौडा यांचे जावई हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ बंगलोर ग्रामीणमधून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवीत आहेत. ते गत निवडणुकीतील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्याविरुद्ध उभे आहेत.- भाजपने देखील घराणेशाही सोडलेली नाही. विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांना बाजूला केल्याने भाजपचा दारुण पराभव झाला, असे मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना पक्षश्रेष्ठींनी निवडलेले आहे. - येडीयुरप्पा यांचे चिरंजीव खासदार डी. वाय. राघवेंद्र यांना शिवमोगातून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेले आहे. तसेच येडीयुरप्पा यांच्या गटातील केंद्रीय राज्यमंत्री शोभा करदलांजे यांना बंगळुरू उत्तर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.