Karnataka Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या नेत्यांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांचा समावेश आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजपने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, विशिष्ठ उमेदवाराला मतदान न करण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना धमकावले जात आहे.
एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओवरुन वाद सुरू आहे, तर दुसरीकडे कर्नाटक भाजपने राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे भाजप अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांना विशिष्ट उमेदवाराला मतदान न करण्याची धमकी देत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, भाजपने अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लोकांना विशिष्ट उमेदवाराला मतदान न करण्यासाठी धमकावले आहे. तसेच, राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांचे ॲनिमेटेड व्हिडिओ वापरुन काँग्रेस पक्ष एका विशिष्ट धर्माची बाजू घेत आहे आणि SC/ST आणि OBC समुदायाच्या सदस्यांना दाबत आहे, हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला असून, तो आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया आणि कम्युनिकेशन हेड रमेश बाबू यांनी तक्रारीचे पत्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिले आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात भाजपने शेअर केलेल्या व्हिडिओच्या लिंक आणि पोस्टही शेअर करण्यात आल्या आहेत. या पत्रात जेपी नड्डा, अमित मालवीय आणि बीवाय विजयेंद्र यांची नावे आहेत.