चंद्रकांत कित्तुरेबंगळुरू : भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांसाठी २६ एप्रिल आणि ७ मे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १४ जागांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आजपर्यंत सर्वाधिक २५ जागा जिंकणाऱ्या भाजपपुढे या निवडणुकीतही त्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे, तर पाच हमी योजनांच्या जोरावर राज्यात सत्तेत आलेली काँग्रेस लोकसभेसाठी विधानसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्याची आशा बाळगून आहे.
जुन्या म्हैसूर आणि किनारपट्टीवरील दक्षिण कर्नाटकातील लोकसभेच्या १४ जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. या १४ जागांपैकी २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. या भागात लिंगायत समाजातील वोक्कलिगा मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावेळी जनता दल भाजप आघाडीत आहे. भाजपला या निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार काँग्रेसच्या जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
मतदानावर पडेल यांचा प्रभावराज्यात गेल्या चाळीस वर्षांतील भीषण दुष्काळ यंदा पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी केंद्राने पुरेशी मदत दिली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. राज्याकडून जाणारा महसूल आणि केंद्राकडून राज्याला मिळणारा त्यातील वाटा यातही अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते करीत आहेत. राज्यातील बेरोजगारीचा मुद्दाही प्रभावी ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे नेतृत्व न दिल्याने ते नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठी त्याचे पुत्र बी. वाय. विजेंद्र यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र, यावरून भाजपवरही घराणेशाहीचा आरोप होत आहे. भाजप मोदी सरकारच्या योजना आणि विकासकामांतील यश यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे. काँग्रेस विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राबविलेल्या पाच हमी योजना आणि स्थानिक मुद्द्यांवर भर देत आहे.