कर्नाटकात हनुमान चालिसा लावल्याने तरुणावर हल्ला; पीएम मोदींची काँग्रेसवर टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 06:51 PM2024-04-23T18:51:20+5:302024-04-23T18:52:00+5:30
'काँग्रेसची विचारसरणी तुष्टीकरणाची, व्होट बँकेच्या राजकारणासाठी एससी/एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.'
Karnataka Lok Sabha Election : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हनुमान चालिसा लावल्यामुळे एका दुकानदाराला काही मुस्लिम तरुणांकडून बेदम मारहाण झाली होती. त्या दिवसापासून हे प्रकरण भाजपने चांगलेच उचलून धरले असून, राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. आता हे प्रकरण मंगळवारी(दि.23) पुन्हा एकदा चर्चेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर येथे आयोजित एका निवडणूक रॅलीत बोलताना पीएम मोदी म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस राजवटीत एका दुकानदाराला हनुमान चालीसा लावल्यामुळे मारहाण करण्यात आली. काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा आहे.
कुछ दिन पहले कांग्रेस के शासन वाले कर्नाटक में एक छोटे दुकानदार को केवल इसलिए बुरी तरह से पीटा गया, क्योंकि वो अपनी दुकान में बैठे-बैठे हनुमान चालीसा सुन रहा था।
— BJP (@BJP4India) April 23, 2024
आप कल्पना कर सकते हैं...
कांग्रेस के राज में हनुमान चालीसा सुनना भी गुनाह हो जाता है।
- प्रधानमंत्री श्री… pic.twitter.com/HMlJwFhySz
मोदी पुढे म्हणतात, काँग्रेसची विचारसरणी नेहमीच तुष्टीकरणाची राहिली आहे. 2004 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच त्यांनी आंध्र प्रदेशातील एससी/एसटीचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना देण्याचे काम केले. 2011 मध्ये काँग्रेसने संपूर्ण देशात याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी एससी/एसटी आणि ओबीसींना दिलेले हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.
परसो मैंने राजस्थान में देश के सामने सत्य रखा था कि कांग्रेस आपकी संपत्ति छीनकर अपने खास लोगों को बांटने की गहरी साजिश रचकर बैठी है।
— BJP (@BJP4India) April 23, 2024
मैंने कांग्रेस की वोटबैंक और तुष्टिकरण की राजनीति का पर्दाफाश किया था।
मैं कांग्रेस से पूछना चाहता हूं कि आखिर वो सच्चाई से इतना डरते क्यों हैं?… pic.twitter.com/ulxTFsZtWQ
परवा मी देशासमोर सत्य मांडले होते की, काँग्रेस तुमची संपत्ती हिसकावून आपल्या खास लोकांना वाटण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचे व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण मी उघड केले. काँग्रेसने सत्तेत असताना दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी छेडछाड केली. बाबासाहेबांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना दिलेला आरक्षणाचा अधिकार काँग्रेसला धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचा होता. मी तुम्हाला गॅरंटी देतो की, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण संपणार नाही आणि धर्माच्या नावावर फूट पडू देणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.
कर्नाटकात काय घडले?
7 मार्च 2024 रोजी बंगळुरू येथे काही तरुणांनी हनुमान चालिसा लावल्यामुळे एका दुकानदारावर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या घटनेनंतर पीडित मुकेशने त्याच्याच परिसरातील सुलेमान, शाहनवाज, दानिश यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाने कर्नाटकात मोठा गदारोळ झाला. दुसऱ्या दिवशी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी पीडित दुकानदाराची भेट घेतली आणि राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.