Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात लोकसभा निवडणूक चुरशीने झाली. कर्नाटक लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात भाजपा १६ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. दोन दिवसापूर्वी एक्झिट पोल आले होते, या पोलमध्ये कर्नाटकात एनडीएला २३ ते २५ जागा मिळतील असा अंदाज देण्यात आला होता. तर, इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, आता एक्झिट पोलच्या उलट निकाल लागल्याचे दिसत आहे.
कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यावेळी एनडीएसोबत निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या लोकसभा निवडणुकीतील लढत दुरंगी झाली. भारतीय जनता पक्ष कर्नाटकात २०२४ च्या लोकसभा निवडणुका माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यांच्यासोबत युती केली.
कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. येथे दोन टप्प्यात मतदान झाले. दोन्ही टप्प्यात प्रत्येकी १४ जागांवर मतदान झाले. एकूण जागांपैकी भाजपचे उमेदवार २५ जागांवर तर जनता दल उमेदवार ३ जागांवर निवडणूक लढले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्रात कोण पुढे?
महाराष्ट्रातील निकाल समोर आले आहेत. दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी १२ ते १५ जागांवर आघाडी घेऊ शकते असं दाखवण्यात आलं होतं, तर महायुती राज्यात २८ ते ३० जागांवर आघाडी घऊ शकते असं दाखवण्यात आलं होतं. पण, दुपारी १ वाजेपर्यंत आलेले निकाल या उलट असल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी २७ जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती २० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
विदर्भातही महाविकास आघाडीच्या जागा आघाडीवर असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातही तशीच परिस्थिती दिसत आहे. दरम्यान, राज्यात चुरशीची लढत दिसत आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे आघाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या, तर राम सातपुते पिछाडीवर होते. दरम्यान, राज्यात अनेक मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असल्याचं दिसत आहे.