बंगळुरु : काँग्रेसच्या पडत्या काळात धावून जाणारे राज्य म्हणून कर्नाटकला ओळखले जाते. या ठिकाणी इंदिरा गांधी, सोनिया गांधींनी लोकसभा निवडणूक लढविली आणि जिंकली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांतील काँग्रेसच्या राज्य सरकारविरोधातील राग यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निघण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. यापैकी 2014 मध्ये भाजपाला 17, काँग्रेसला 9 आणि जेडीएसला 2 जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे यंदा काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आघाडी असून याचा फायदाही काँग्रेसला होण्य़ाची शक्यता आहे.गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारला मतदारांनी नाकारले होते. मात्र, भाजपालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्याने आणि मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याचा राग काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होता. ही नाराजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निघण्याची शक्यता आहे. या नाराजीचा फायदा मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ असलेले भाजपाचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा यांनी उठविला आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी जास्तीत जास्त खासदार भाजपाचे आल्यास कर्नाटकातील सरकार पडणार असल्याची वक्तव्ये केली होती. तसेच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर आमदारांना करोडो रुपयांनी ऑफर दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आणीबाणीनंतर इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सोनिया गांधी यांना हात देणाऱ्या कर्नाटकमध्ये कोणाची सरशी होते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
इंदिरा गांधी कर्नाटकमध्ये कधी लढल्या?आणीबाणी लादल्यानंतर आलेल्या विरोधी लाटेत इंदिरा गांधींना तेव्हा कर्नाटकने साथ दिली होती. 1977 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पोटनिवडणुकीत नोव्हेंबर 1978 मध्ये इंदिरा गांधी यांनी चिक्कमंगळूरमधून निवडणूक लढविली होती. या मतदारसंघाने इंदिरा यांना नवसंजिवनी मिळवून दिली. जनता पक्षाच्या विरेंद्र पाटील यांना त्यांनी 70 हजार मतांनी मात दिली होती. या विजयात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांनी मोलाचा वाटा उचलला होता. 1977 च्या निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसला सपाटून मार खावा लागलेला असताना एकट्या कर्नाटकात 28 पैकी 24 जागा मिळाल्या होत्या. इंदिरा गांधींसाठी चिक्कमंगळूमधून दोनवेळा खासदार झालेल्या डीबी चंद्रेगौडा यांनी खासदारकीवर पाणी सोडले होते. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या या त्यागाचे भविष्यात काहीच फळ मिळाले नाही.