बंगळुरू: सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटकमधील राजकारण चांगलेच तापले आहे. या सगळ्या धामधुमीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपादेखील याला अपवाद नाही. परंतु, प्रचारातील एका घोडचुकीमुळे सध्या भाजपाची चांगलीच नाचक्की होत आहे. निवडणुकीचा प्रचार करताना भाजपाकडून काँग्रेसच्या काळात 'जिहादी' हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या 23 कार्यकर्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. भाजपाच्या उडुपीतील खासदार शोभा करंदलाजे यांनी ही यादी तयार करून केंद्रीय गृहखात्याकडे पाठविली होती. या यादीत पहिल्याच क्रमांकावर अशोक पुजारी हे नाव नमूद करण्यात आले होते. काँग्रेसच्या राजवटीत 20 सप्टेंबर 2015 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचेही यादीत म्हटले होते. परंतु अशोक पुजारी जिवंत असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांना याचा पत्ता लागला आणि त्यांनी उत्तर मंगळुरूनजीकच्या असणाऱ्या खेड्यात जाऊन गाठले. यावेळी अशोक पुजारी यांनी दिलेल्या माहितीमुळे भाजपाला तोंडघशी पडल्यासारखे झाले आहे. अशोक पुजारी हे बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते आहेत. 2015 मध्ये त्यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पुजारी 15 दिवस अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होते. या सगळ्यातून ते सहीसलामत बचावले. परंतु, भाजपाने अतिउत्साहाच्या भरात कोणतीही खातरजमा न करता अशोक पुजारी यांना शहीद म्हणून घोषित केले. हा सगळा घोळ लक्षात आल्यानंतर शोभा करंदलाजे यांनी पुजारी यांना फोन करून आपली चूक मान्य केली. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे भाजपाची चांगलीच नाचक्की झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत काँग्रेसच्या राजवटीत आमचे 23 कार्यकर्ते शहीद झाल्याचा उल्लेख केला होता. परंतु काँग्रेस सरकारकडून हा दावा फेटाळण्यात आला होता. या सगळ्याचा मुस्लिमांशी कोणताही संबंध नसून यापैकी अनेक हत्या पूर्ववैमन्यसातून तर काही प्रकरणे ही आत्महत्येची असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे एवढे होऊनही विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक पदाधिकारी जगदीश शेणवा चूक मान्य करायला तयार नाहीत. भाजपा खोटी माहिती देणारच नाही. त्यांनी अशोक पुजारीचे नाव मृतांच्या यादीत दिले असेल तर ते बरोबरच असेल, अशी प्रतिक्रिया जगदीश शेणवा यांनी दिली.
भाजपाचा 'शहीद' झालेला तो कार्यकर्ता आहे जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 1:42 PM