बंगळुरू: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी जवळपास ६० टक्के रुग्ण केरळमधील आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील निर्बंध शिथिल झाल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात विक्रमी लसीकरण सुरू आहे. मात्र कर्नाटकमध्ये लसीकरण अभियानात मोठा निष्काळजीपणा झाला आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या सुलिया तालुक्यात एका १९ वर्षीय मजुराला एकाच दिवसात कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. लसीकरण केंद्रात अवघ्या काही मिनिटांत मजुराला कोविशील्ड लसीचे दोन डोस दिले गेले. ही माहिती समोर येताच लसीकरण केंद्रात खळबळ उडाली. त्यानंतर मजुराला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. सुलिया तालुक्यातल्या दुग्गलडका गावातील एका शाळेत हा प्रकार घडला.
केंद्र सरकारकडून बुधवारी महालसीकरण अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मजुरी करणारा तरुणदेखील लस घेण्यासाठी पोहोचला होता. लसीकरण झाल्यानंतरही तरुण खोलीतून बाहेर न गेल्यानं हा प्रकार घडल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. 'लसीकरण अभियानात असलेली नर्स लोकांना बोलावून लसीकरण करत होती. त्याच दरम्यान तरुणाला बोलावण्यात आलं. तो लस घेण्यासाठी गेला. दुसऱ्यांदा लस दिली जात असताना तो काहीच बोलला नाही. थोड्याच वेळापूर्वी पहिला डोस घेतल्याची माहिती त्यानं नर्सला दिली नाही,' असं अधिकाऱ्यानं सांगितलं.