म्हैसूर- श्रीरंगपटणम येथिल एका लॉजमध्ये एका 69 वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गळफास लावून या व्यक्तीने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्या केलेल्या व्यक्तीने 40 हजार रूपयांचा चेक स्वतःच्या अंत्यविधीसाठी सही करून ठेवला होता. इतकंच नाही, तर अंत्यविधी कसे होतील व ते कोण करेल हेसुद्धा त्या व्यक्तीने लिहून ठेवलं.
रामकृष्ण असं या व्यक्तीचं नाव असून ते म्हैसूरमधील रामकृष्णानगर भागात राहत होते. मंगळवारी त्यांनी श्रीरंगपटणम येथिल एका लॉजमध्ये चेक इन केलं व दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. 'आरोग्याच्या तक्रारींमुळे रामकृष्ण हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज कुटुंबीयांनी वर्तविली आहे. आपण कुटुंबावर ओझं बनू नये, असा त्यांचा विचार होता. रामकृष्ण यांची मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. त्यांच्यावर ओझ नको, असा विचार त्यांच्या मनात असायचा, अशी माहिती मिळाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रामकृष्ण यांना नेमका कोणता आजार होता याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. पण काही अवयव निकामी झाल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान. 'प्रसिद्ध धर्मगुरू भानूप्रकाश शर्मा यांच्या हस्ते अंत्यविधी पार पाडावे, अशी शेवटची इच्छा असल्याचं, रामकृष्ण यांनी सुसाइट नोटमध्ये लिहिलं आहे.