नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,81,75,044 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,27,510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,795 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,31,895 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे कर्नाटकमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भावूक करणारी एक घटना समोर आली आहे. लेकाचा जीव वाचवण्यासाठी एका पित्याची धडपड पाहायला मिळाली आहे. औषधासाठी सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील कोप्पलू गावात ही घटना घडली. आनंद असं या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद यांनी त्यांच्या दहा वर्षीय मुलाला लागणारं औषध आणण्यासाठी सायकलवरून थेट बंगळुरू गाठलं. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला आणि मुलासाठी औषध आणलं. आनंद सांगतात की, माझा मुलगा आजारी आहे. मला औषधासाठी सायकलने जावे लागले. बर्याच ठिकाणी औषध शोधले. पण ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सायकलने जाण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
कोरोना आधी दर दोन महिन्यांनी आनंद बंगळुरूला जाऊन ते औषध आणत असत. मात्र आता लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे घरामध्ये असलेलं औषध संपलं. मुलाचा जीव वाचवण्यासाठी औषध महत्त्वाचं असल्याने आनंद यांनी सायकलच्या मदतीने बंगळुरूला जाण्याचा निर्णय पक्का केला. 23 मे रोजी ते बंगळुरूला जाण्यासाठी निघाले आणि त्यानंतर 26 मे रोजी तिथून परत आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा तीन लाखांच्या खाली आला आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 2 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
मे महिना ठरला धडकी भरवणारा! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, रेकॉर्ड मोडला
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त मे महिन्यात कोरोनाच्या 90.3 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महिन्याच्या शेवटी थोडासा दिलासा मिळाला. मात्र तरीही एप्रिलच्या तुलनेत 30% जास्त आहे. एप्रिल महिन्यात एकूण 69.4 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तसेच मे महिन्यात जवळपास एक लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा खूपच जास्त असून एप्रिलच्या तुलनेत अधिक आहे. जगातील सर्वात वाईट कोरोना महिन्याबद्दल बोलायचे मे आधी तर डिसेंबर महिना अमेरिकेसाठी सर्वात धोकादायक ठरला. डिसेंबरमध्ये अमेरिकेत एकूण 65.3 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षाच्या जानेवारीत अमेरिकेसाठी मृत्यूचा आकडा सर्वात धोकादायक होता. यावर्षी जानेवारीमध्ये कोरोनाने अमेरिकेत 99,680 लोकांचा बळी घेतला.