ऑनलाइन लोकमत
मंगळुरु, दि. 02 - केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने कालपासून (दि.01) लागू केला आहे. मात्र, कर्नाटकमधील एका मंत्र्याने आपल्या गाडीवरील लाल दिवा हटविण्यास नकार दिला आहे.
कर्नाटकमधील अन्न व नागरी पुरवठामंत्री यू. टी. खादेर यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करत, जर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी मला गाडीवरील लाल दिवा हटविण्याच्या सूचना दिल्या, तरच मी लाल दिवा काढेन, असे म्हटले आहे. व्हिआयपी गाड्यांवरील लाल दिवा हटविण्याबाबत माझी काही हरकत नाही, मात्र यापेक्षा केंद्र सरकारने चांगल्या योजना आणल्या पाहिजे. लोकांना पोटवर जेवण मिळेल आणि शिक्षणाच्या सुविधा मिळतील अशा योजना सरकारने आणाव्यात. माझ्या कारमध्ये बदल करण्याचा मला अधिकार नाही. त्याबद्दल कॅबिनेट निर्णय घेईल, असेही खादेर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. तसेच, लोकांना व्हीआयपीच्या पातळीवर आणण्याचा केंद्र सरकारचा उद्देश असला पाहिजे, असेही खादेर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा 1 मे पासून कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात 17 एप्रिलला केंद्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर अनेक नेत्यांनी लगेचच आपल्या गाडीवरून लाल दिवा काढून टाकला. आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांच्या वाहनांवर लाल दिवा असेल.