गुजरात नव्हे, कर्नाटक मॉडेल! काँग्रेसकडूनही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 01:34 PM2023-04-04T13:34:44+5:302023-04-04T13:36:03+5:30

प्रत्येक मतदारसंघात गुप्त मतदानाद्वारे नावे निश्चित करण्याचा भाजपचा प्रयत्न

Karnataka model, not Gujarat! Preparations from Congress too | गुजरात नव्हे, कर्नाटक मॉडेल! काँग्रेसकडूनही तयारी

गुजरात नव्हे, कर्नाटक मॉडेल! काँग्रेसकडूनही तयारी

googlenewsNext

बेंगळूरू: कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने गुजरात-उत्तर प्रदेश मॉडेल सोडून कर्नाटक मॉडेल तयार केले आहे. उमेदवार निवडीत याचा वापर केला जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० पदाधिकाऱ्यांकडून गुप्त मतदान घेऊन तीन संभाव्य नावांची यादी तयार करण्यात आली, ज्यावर राज्य आणि केंद्र स्तरावर विचार करून नावे निश्चित करण्याचे नियोजन आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘नो रिपीट’ धोरणात अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील सध्याच्या ११९ आमदारांपैकी ५-७ टक्के आमदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. गुजरातप्रमाणे वयोवृद्ध नेत्याला उमेदवारी न देण्याचा फॉर्म्युला कर्नाटकात प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमीच आहे.

काँग्रेसकडूनही तयारी

काँग्रेसने अनेक महिने अगोदरच तिकीट इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. त्यानंतर योग्य उमेदवार घोषित केले जात आहेत. काँग्रेसने अर्जासोबत तिकीट दावेदारांकडून २ लाख रुपये शुल्कही आकारले होते. पहिल्या टप्प्यात, काँग्रेसने १२४ जागांसाठी उमेदवार घोषित केले जेथे एकापेक्षा जास्त दावेदार नव्हते. उर्वरित जागांसाठीही पक्ष प्रत्येक बाबी लक्षात घेऊन उमेदवार निवडीत गुंतला आहे.

भाजपचे कर्नाटक मॉडेल काय?

- सर्व २२४ विधानसभा मतदारसंघात संभाव्य नावांची यादी तयार करून गुप्त मतदान घेण्यात आले.
- प्रत्येक नावासाठी जनाधार किती आहे याच्या आधारावर उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
- जवळपास २४ हजार लोकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.

अंतर्गत बंड शमवण्याचे आव्हान

भाजप, काँग्रेस आणि जनता दल-एस या राज्यातील तिन्ही प्रमुख पक्षांसमोर अंतर्गत बंड शमवण्याचे मोठे मोठे आव्हान आहे. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षांना उमेदवारांच्या निवडीवरून असंतोष निर्माण होण्याचा धोका पत्करायचा नाही. याची काळजी ते घेत आहेत.

अपात्रतेचा मुद्दा करेल भाजपचा पराभव

राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवणे, हा विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचाराचा मुद्दा असेल आणि तो राज्यातील भाजप सरकारच्या पराभवास कारणीभूत ठरेल, असा दावा पक्षाचे माजी मुख्यमंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी सोमवारी केला. ते म्हणाले की, राज्यात काँग्रेसला पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे, असेही ते म्हणाले.

भाजप उमेदवार कोण, हे शनिवारी ठरणार

भाजप संसदीय मंडळाची ८ एप्रिल रोजी बैठक होण्याची शक्यता आहे आणि तीत १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी अंतिम होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. सत्ताधारी पक्षाकडे प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी सर्वेक्षण अहवाल आहेत, परंतु उमेदवारांची नावे निश्चित करण्यापूर्वी जिल्हा सुकाणू समित्यांकडून मत मागवले आहे.

Web Title: Karnataka model, not Gujarat! Preparations from Congress too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.