कर्नाटकाच्या कोडिजेनहळ्ळीमध्ये एका चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने राज्यातील सरकारला खडबडून जागे केले आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची रॅली सुरु असताना त्या मृत मुलाच्या बापाने न्यायासाठी मृतदेह रॅलीत आणला आणि खळबळ उडाली. आपल्या मुलाला वेळेवर उपचार मिळाले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप बापाने केला आहे. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मनही हेलावले होते.
हा मुलगा पाण्याच्या टाकीत पडला होता. त्याला लगेचच सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. तशाच विशन्न अवस्थेत त्याचे आईवडील त्याला घेऊन घरी येत होते. तेवढ्यात वाटेत कुमारस्वामींची रॅली सुरु असल्याचे पित्याने पाहिले आणि मुलाचा मृतदेह थेट कुमारस्वामींकडे नेऊन ठेवला. कोणाला काही कळण्याचा मार्ग नव्हता. कुमारस्वामींच्या स्थानिक नेत्याने त्या मुलाचा मृतदेह हातात घेतला. मुलाच्या बापाने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी कुमारस्वामींकडे केली.
कुमारस्वामींनी तिथूनच अधिकाऱ्यांना फोन लावला आणि माहिती घेतली. कोडिहळ्ळी सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हजर नव्हते. यामुळे उपचारास विलंब झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कुमारस्वामींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोन लावले, त्यांच्याकडून कुटुंबाला नुकसान भरपाई आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन घेतले.
या धक्कादायक प्रकाराची माहिती आरोग्य मंत्र्यांना मिळताच त्यांनी विभागिय चौकशीचे आदेश दिले. कोडीहळ्ळी हे दोन डॉक्टरांच्य़ा जबाबदारीखाली २४ तास सुरु असणारे हॉस्पिटल आहे. यामुळे तिथे एकतरी डॉक्टर असायला हवा होता, असे सुधाकर यांनी सांगितले. तसेच डॉक्टर आणि विलंबाने येणाऱ्या अॅम्बुलन्स चालकावरदेखील निलंबनाची कारवाई केली आहे. मुलगा सव्वाचारच्या सुमारास पाण्यात पडला होता, त्याला पाच वाजता ह़ॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते असेही सांगितले जात आहे.