नवी दिल्ली : काजू व कोको विकास संचलनालय कोचिनमधून चंदगडला स्थलांतरित करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचा आग्रह सुरू असताना कर्नाटकमधील खासदारही त्यांच्या राज्यात केंद्र नेण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
केरळमधून हे संचलनालय महाराष्ट्रात आल्यास संपूर्ण देशाला फायदा होईल, परंतु आता कर्नाटकच्या खासदारांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. मराठी खासदारांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) व कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले आहे. कर्नाटकमधील खासदार केंद्रीय कृषी मंत्री व पंतप्रधानांना यासंदर्भात भेटणार होते, पण अधिवेशन वेळेआधीच संपल्याने भेट बारगळली.
ते म्हणाले, भारत काजू उत्पादनात जागतिक लिडर होता. आता स्थिती उलट असली तरी भारताच्या एकूण उत्पादनात ३५ टक्के वाटा केवळ महाराष्ट्राचा आहे. खासदार छत्रपती संभाजी यासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधान मोदी यांना भेटणार होते. कोरोनामुळे संसद अधिवेशनाचा कालावधी कमी झाल्याने भेट झाली नाही.
खासदार विनय सहस्त्रबुद्धे, खासदार छत्रपती संभाजी, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील व स्थानिक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी पंतप्रधान कार्यालय केंद्रीय कृषी मंत्रालयास पत्र लिहिले आहे.
५० वर्षांपूर्वी करण्यात आली कोचिनमध्ये स्थापनाकाजू व कोको विकास संचलनालयाची स्थापना ५० वर्षांपूर्वी कोचिनमध्ये करण्यात आली. केरळमध्येच काजूचे उत्पादन सर्वाधिक होत असे. तेव्हा संचलनालय तेथे असणे योग्य होते. परंतु, आता ही जागा महाराष्ट्राने घेतल्याने महाराष्ट्रातच संचलनालय स्थलांतरीत व्हायला हवे, असे मत एपेडाचे माजी सल्लागार व स्टार्ट अप इंडियाचे मेंटर डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केले.