Karnatak Crime: नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेलं पोलीस प्रशासनच आता भक्षक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकात एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. मात्र तिथल्याच पोलीस हवालदाराने तिला बळी बनवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. या सगळ्या प्रकरामुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बंगळुरुतील बोम्मनहल्ली पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला अटक करण्यात आलीय. पीडिता तक्रार दाखल करण्यासाठी बोम्मनहल्ली पोलीस ठाण्यात गेली होती. तेव्हा आरोपी हवालदाराने तिला मदत करण्याच्या नावाखाली तिच्या मजबुरीचा फायदा घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता डिसेंबरमध्ये तिच्या शेजारी राहणाऱ्या विक्की नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यासाठी आईसह मायको बोम्मनहल्ली पोलीस ठाण्यात गेली होती. लग्नाच्या बहाण्याने विकीने पीडितेवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे यासंदर्भात तक्रार देण्यासाठी पीडिता पोलीस ठाण्यात पोहोचली होती. मुलीची तक्रार नोंदवून या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. मात्र त्याच शेजारच्या विक्कीच्या मदतीने हवालदार अरुण थोनेपा मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले.
मदत करतो असं सांगून अरुणने पीडितेला २२ आणि ३० डिसेंबर रोजी एका हॉटेलमध्ये नेलं होतं. त्यादरम्यान आरोपीने तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने एवढ्यावर न थांबता हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवला होता. याच्याच आधारे त्याने मुलीला धमकावले आणि जर याबाबत कोणाला काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली.
मुलीने कशीतरी ही घटना तिच्या आईला सांगितली. शेजारी आणि हवालदार अरुणने मुलीवर बलात्कार केल्याचे आईला समजल्यानंतर तिने १३ फेब्रुवारी रोजी दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच दिवशी शेजारी राहणाऱ्या विक्कीला अटक केली. त्यानंतर काही दिवसांनी अरुण थोनेपा यालाही अटक केली. या दोघांविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हवालदार अरुण हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तक्रार दाखल होताच तो शहरातून पळून गेला होता. माझ्या मुलीला बिअरमधून झोपेच्या गोळ्या देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार पीडितेच्या आईने दिली आहे.