दावणगेरे: तुरुंगातून कैदी पळून गेल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. कर्नाटकात अशीच घटना घडली आहे. येथील दावणगेरे उप कारागृहाच्या 40 फूट उंच भिंतीवरुन उडी मारुन कैद्याने पलायन केले. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली. कैदी फरार झाल्याची घटना कारागृहात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वसंत असे फरार कैद्याचे नाव असून त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
कर्नाटकचे हे तुरुंग अत्यंत हायटेक असल्याचे सांगण्यात येते. या कारागृहात कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही असतानाही कैद्याने 40 फूट उंच भिंतीवरुन उडी मारल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. कर्नाटकच्या हायटेक कारागृहातून कैदी फरार झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, 23 वर्षीय फरार वसंतला दुसऱ्या दिवशी हावेरी येथून पुन्हा अटक करण्यात आली.
उडी मारल्याने पायाला दुखापतवसंतला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी वसंतने तुरुंगाच्या 40 फूट उंच भिंतीवरुन उडी मारुन पलायन केले. इतक्या उंचीवरुन उडी मारल्याने वसंतच्या पायाला बरीच दुखापत झाली, मात्र तरीही तो तेथून निसटला. अखेर दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा पकडण्यात आले.