बेळगाव- कर्नाटकातील बेळगावमध्ये पोलिसांनी नव्या 2 हजार व 5 रुपयांच्या नोटा तसंच जुन्या 1 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. या नोटांची एकुण किंमत 7 कोटी आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई करत नोटा जप्त केल्या तसंच याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी निवडणूक पार पाडते आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे. जप्त केलेली रक्कम ही ग्रामीण भागात निवडणुकीसाठीची होती, अशीही चर्चा आता रंगली आहे. पण जप्त केलेला पैसा नेमका कुठून आला? याबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
12 मे रोजी कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होणार आहे. देशाचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं जाणार व २०१९मध्ये जनमताचा कल काय असेल, हे ठरविणारी ही निवडणूक असल्यानं त्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.