Karnataka Politics: मे महिन्यात कर्नाटकात सत्तांतर झाले आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. पण, कर्नाटक पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरुन पक्षात वाद सुरू झाला आहे. आता फक्त डीके शिवकुमारच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे आणि मंत्री परमेश्वरा यांचाही सिद्धरामय्या यांच्या खुर्चीवर डोळा आहे.
कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी सीएम सिद्धरामय्या यांनी अडीच नव्हे तर पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केले. अडीच वर्षानंतर राज्यात नेतृत्व बदलाचा दावा सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट करत असताना त्यांचे हे वक्तव्य आल्याने वाद सुरू झाला आहे. विशेष म्हणजे आता फक्त डीके शिवकुमार नाही, तर प्रियांक खर्गे आणि जी परमेश्वरा या मंत्र्यांचाही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत समावेश आहे. हायकमांडने जबाबदारी दिल्यास मुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचे प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रीपदावरुन वाद का?कर्नाटक निवडणुकीवेळी काँग्रेसने मुख्यमंत्री चेहरा म्हणून कोणाच्याही नावाची घोषणा केली नव्हती. पक्षाने सत्ता मिळवल्यानंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोघांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला. अखेर पक्षाने यावर तोडगा काढला आणि सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तर, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले. सिद्धरामय्या अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील आणि नंतर डीके शिवकुमार यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल, असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जाते. पण, आता यावरुनच वाद सुरू झाला आहे.
डीके शिवकुमार, प्रियांक खर्गे आणि जी परमेश्वर यांचा दावामंड्याचे आमदार रविकुमार गौर यांच्या दाव्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरू झाला आहे. विद्यमान सरकारची अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना राज्याचे मुख्यमंत्री केले जाईल, असे ते म्हणाले आहेत. या विधानानंतरच राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा दावा केला, त्यानंतर गृहमंत्री परमेश्वरा यांनी त्यांच्या घरी बैठक बोलावली. याशिवाय मंत्री प्रियांक खरगे यांनी थेट मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केले. या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा केल्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. यावर हायकमांड काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे असेल.