मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने सध्या काँग्रेस, भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) यांच्याकडून वेगवेगळ्या राजकीय समीकरणांवर काथ्याकूट सुरू आहे. मात्र, गेल्या 30 वर्षांचा इतिहास पाहता कोणताही राजकीय पक्ष सलग दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेवर आलेला नाही. याशिवाय, काँग्रेसने बहुमतावर सत्ता स्थापन केल्यानंतरच्या पुढील प्रत्येक टर्ममध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्याचा आजवरचा इतिहास आहे. गेल्या 30 वर्षांच्या इतिहासानुसार 2004 सालाचा अपवाद वगळता सत्तारूढ पक्ष पुन्हा कधीही सत्तेत येऊ शकलेले नाही. 2004 मध्ये काँग्रेसने हा चमत्कार केला होता. मात्र, अवघ्या एका वर्षात हे सरकार पडले. तेव्हापासून राजकीय पक्षांना आलटून पालटून सत्ता देण्याचा प्रघात कर्नाटकच्या जनतेने कायम राखला आहे. याशिवाय, जेव्हा जेव्हा कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमतावर सत्ता स्थापन केली त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. गेल्या 30 वर्षांमध्ये तीनदा असे घडले आहे. 1999च्या विधानसभा निवडणुकीत 132 जागा जिंकून काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. परंतु, पुढच्याच निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांचा आकडा 65 पर्यंत खाली घसरला होता. त्यापूर्वी 1989 मध्ये काँग्रेसने 178 जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. तेव्हादेखील पुढच्याच निवडणुकीत म्हणजे 1994 साली काँग्रेसला अवघ्या 34 जागांवर समाधान मानावे लागले होते. शेवटच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसले बहुमतापेक्षा 10 जास्त म्हणजे 122 जागा मिळवत सत्तेची सूत्रे हाती घेतली होती. त्यामुळे यापूर्वीचा पॅटर्न कायम राहिल्यास काँग्रेसचा पराभव अटळ आहे. परंतु, काँग्रेसने सत्ता कायम राखल्यास नवा इतिहास लिहिला जाईल. कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. येणारी विधानसभा ही कर्नाटकची पंधरावी विधानसभा असेल. 12 व्या आणि 13 व्या विधानसभेनंतर 14 विधानसभा ही तुलनेत स्थिर सरकार देणारी ठरली. एका विधानसभेत दोन किंवा तीन मुख्यमंत्री होण्याची रित कर्नाटकसाठी वेगळी नव्हती परंतु 14 व्या विधानसभेत सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले.
Karnataka Election 2018: 'हे' आकडे देतात काँग्रेसच्या पराभवाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 6:11 PM