नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच गेल्या 19 दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 21 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्यानं ही दर वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र गेल्या 19 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. दिल्लीत पेट्रोलचे दर 74.63 रुपयांवरुन 74.80 प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 65.93 रुपयांवरुन 66.14 रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. या दर वाढीमुळे डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. तर पेट्रोलनंदेखील 56 महिन्यांमधील सर्वाधिक दर नोंदवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन आठवडे असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र त्यानंतर गेले तीन आठवडे इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींप्रमाणे बदलत राहतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान होण्याच्या 19 दिवसांपासून या दरांमध्ये कोणाताही बदल झाला नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमतींनुसार पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये बदल न झाल्यानं इंधन कंपन्यांचं 500 कोटी रुपयांचं नुकसान झालं. याच काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरल्याचा फटकादेखील इंधन कंपन्यांना बसला. 24 एप्रिलला पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र यानंतर 19 दिवस दरांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. या 19 दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर प्रति बॅरल 74.84 डॉलरवरुन 82.93 डॉलरवर पोहोचले.
कर्नाटकमध्ये मतदान होताच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 11:14 AM