- हरीश गुप्ता नवी दिल्ली : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडी-एस) पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतल्याने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१८ मध्ये मे किंवा एप्रिलमध्येच कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त होते. तथापि, गोयल यांच्या या राजकीय खेळीने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.कर्नाटकातील विशेषत: देवेगौडा यांच्या हसन जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पाबाबत गोयल यांनी देवेगौडा यांच्याशी चर्चा केली असली तरी जेडीएस राज्यातील राजकारणातील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीयदृष्टीकोनातून पाहिले जात आहे.भाजप आणि देवेगौडा यांच्यात राजकीयदृष्ट्या फारसे सख्य नाही. तथापि, देवेगौडा यांची काँग्रेसविरोधी भूमिका लक्षात घेता भाजपा आणि जेडीएस दरम्यान राजकीय समझोत्याच्यादृष्टीने त्याची ही भूमिका भाजपसाठी पूरक ठरु शकत,असा भाजपचा कयास आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जेडीएसपेक्षा कमी मते मिळाली होती. २०१८ च्या निवडणुकीत कर्नाटक काँग्रेसकडून हिसकावून घेण्याचा भाजपचा मनसुबा आहे.तथापि, हे काम म्हणावे तेवढे सोपे नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत ३६.६ टक्के मते घेत काँग्रेसने १२२ जागा जिंकल्या होत्या. जेडीएसने २०.२ टक्के मते घेत ४० जागा पटकावल्या होत्या. दुसरीकडे, १९.९ टक्के मताधार प्राप्त करीत भाजपनेही ४० जागा जिंकल्या होत्या; म्हणून काँग्रेसला आगामी निवडणुकीत सत्तेबाहेरच थोपविण्याचा भाजपने प्रयत्न चालविला आहे; परंतु, कर्नाटकच्या राजकारणातील देवेगौडा यांचे महत्त्व पाहता भाजपला समोरील आव्हानांची जाणीव आहे.प्रकाश जावडेकर हे कर्नाटकचे प्रभारी तर गोयल कर्नाटकचे सह-प्रभारीही आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी खास जबाबदारी सोपवित या दोन्ही मंत्र्यांची यासाठी नियुक्ती केली आहे.
कर्नाटकची तयारी? गोयल गेले देवेगौडांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 2:12 AM