रायचूर :कर्नाटकातील रायचूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परंपरेच्या नावाखाली काँग्रेस आमदाराच्या मुलाने अनेक जंगली सशांची कत्तल केली. या प्रकरणी काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि भावासह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायचूर जिल्ह्यातील त्रुविहल गावात ही घटना घडली. येथे युगादीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी स्थानिक मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मस्की येथील काँग्रेस आमदार बसनागौडा त्रुविहल यांचा मुलगा सतीश गौडा आणि भाऊ सिद्दन गौडा याने मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी त्या दोघांसह त्यांच्यासोबत आलेल्या इतर काही लोकांनी काठीला मृत जंगली ससे बांधून हवेत भिरकावले. यावेळी त्यांच्या हातात तलावारी आणि इतर शस्त्रेही दिसत आहेत.
काय आहे ही परंपरा ?हा गावातील आदिवासी परंपरेचा भाग आहे, मात्र हे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विरोधात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनविभागाने आमदाराचा भाऊ आणि मुलासह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वनविभागाच्या कारवाईनंतर पोलीसही न्यायालयाच्या निर्देशांची वाट पाहत आहेत.
मात्र, मस्कीचे आमदार बसनागौडा, भाऊ आणि मुलाचा बचाव करताना दिसले. ते म्हणतात की, ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांमध्ये अशा प्रथांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आमदाराने केला. जंगली सशाच्या शिकारीचा प्रश्न आहे, मला त्याबद्दल काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक काय म्हणाले?याप्रकरणी एसपी रायचूर पुट्टमदैय्या यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले, त्रुविहाळ नावाच्या ठिकाणी सोमवारी सशाच्या शिकारीची घटना घडली होत. ही घटना मंगळवारी आम्हाला समजली. घटनेची माहिती मिळताच आम्ही वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयाला माहिती देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात सज्जन गौडा, सतीश गौडा, दुर्गेश आदी सहभागी झाले होते. सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.