भाजपाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेसच्या दाव्याने कर्नाटकमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:46 AM2019-10-15T11:46:52+5:302019-10-15T11:48:20+5:30
येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
बंगळुरू - येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपाचे काही नाराज आमदार काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. जारकीहोळी यांच्या या दाव्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, ''भाजपाच्या काही असंतुष्ट आमदरांनी आमच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे. आता पुढे काय होते हे पाहावे लागेल. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आम्ही प्रत्येकाला पक्षात घेऊ शकत नाही किंवा सर्वांना सोडूही शकत नाही. हे विधानसभा मतदारसंघांच्या स्थितीवर अवलंबून असेल.''
''होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवारी देऊ, अशी भाजपाच्या काही नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र आपचा पक्ष निवडणुकीपूर्वी त्याबाबत विचार करेल. मी यासंदर्भात हायकमांडशी चर्चा केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता प्रचारात गुंतले आहेत.''असेही जारकीहोळी यांनी सांगितले.
दरम्यान, येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यापासून कर्नाटकमधील राजकीय स्थिती बऱ्यापैकी स्थिर आहे. मे 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यानंतर स्थापन झालेले कुमारस्वामी सरकार लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे 14 महिन्यांतच कोसळले.
जुलै महिन्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या मिळून 15 आमदारांनी राजीनामा देत भाजपाची वाट धरली होती. खूप मनधरणी केल्यानंतरही या आमदारांनी पक्षाविरोधातील बंडखोरी मागे घेतली नव्हती. अखेर दोन ते तीन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, आता येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार काहीसे स्थिर असल्याचे दिसत असतानाचा काँग्रेस आमदारांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकता अस्थिरतेचे ढग दाटू लागले आहेत.
दरम्यान काही दिवसांत होणारी विधानसभेची पोटनिवडणूक भाजपासाठी महत्त्वपूर्ण ठररणा आहे. सरकार स्थिर करण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान 6 जागा जिंकाव्या लागतील. सध्या कर्नाटक विधानसभेत भाजपाकडे 106 आमदारांचे पाठबळ आहे.