बंगळुरू : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे निकाल नवीन सुरुवात करतील आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी दरवाजे खुले करतील, असे मत राज्याचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले.
राज्यात १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिवकुमार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, २२४ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस १४१ जागा जिंकेल. मोदी फॅक्टर’ दक्षिणेकडील राज्यात काम करणार नाही. येथे लोकांचे लक्ष स्थानिक आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित आहे.
मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष नाहीत्यांच्यात आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून कोणताही संघर्ष नाही. भाजपचा पराभव करणे आणि काँग्रेसचा विजय निश्चित करणे, हे एकमेव उद्दिष्ट आहे, असे शिवकुमार म्हणाले. निवडणुकीत केवळ स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार की ‘मोदी विरुद्ध राहुल गांधी’ अशी लढत होणार? असा सवाल केला असता ते म्हणाले की, ही निवडणूक कर्नाटकशी संबंधित आहे. आम्हाला विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
निवडणूक-संबंधित गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण जास्त आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक दोषी आढळले आहेत. या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण राज्यात जास्त आहे, असे कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांनी सांगितले. २०१३ ते २०१९ या काळात झालेल्या निवडणुकांशी संबंधित ही आकडेवारी आहे. गेल्या वेळी २००० प्रकरणे दाखल करण्यात आली होती. ते म्हणाले की, आचारसंहिता लागू झाल्यापासून २९२ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत.