लखनऊ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या येडियुरप्पा आणि जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला काँग्रेसनं पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसच्या या युतीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी मायावती यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना फोन केला होता. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असा सल्लादेखील मायावती यांनी दिला होता. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानं देवेगौडा यांच्या जेडीएस पक्षाशी निवडणूक पूर्व युती केली होती. बहुजन समाज पक्षानं कर्नाटकमध्ये 20 जागा लढवल्या होत्या. याशिवाय मायावती यांनी स्वत: जेडीएसच्या नेत्यांसोबत प्रचारसभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत बसपच्या मतांमध्ये घट झाली. 2013 मध्ये बसपला कर्नाटकमध्ये 1.16 टक्के मतं मिळाली होती. हा आकडा यंदा 0.3 टक्क्यांवर आला. मात्र पहिल्यांदाच कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत बसपचा उमेदवार विजयी झाला. बसपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीचे निकाल येताच मायावती यांनी त्यांचे निकटवर्तीय नेते अशोक सिद्धार्थ यांना काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेण्यास सांगितलं. सिद्धार्थ यांच्याकडे पक्षाच्या कर्नाटकमधील प्रचाराची जबाबदारी होती. सिद्धार्थ यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केल्यावर सोनिया गांधींशी संवाद साधला. यानंतर मायावती यांनी जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांच्याशी संपर्क साधत युती करण्याचा सल्ला दिला. देवेगौडा यांच्यानंतर मायावती यांनी सोनिया गांधींशी संपर्क साधला आणि जेडीएसला बाहेरुन पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला सोनिया गांधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Karnataka election results: काँग्रेस-जेडीएसच्या हातमिळवणीमागे 'या' नेत्याचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 12:18 PM