बंगळुरू : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना बदलण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपच्या विधिमंडळ समितीची लवकरच बैठक होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे येडियुरप्पा हे लवकरच गाशा गुंडाळणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. त्यांच्या जागेवर प्रामाणिक, हिंदू समर्थक, तसेच भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यास सक्षम असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केले जाऊ शकते.
मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येडियुरप्पा यांची भाजपच्या आमदारांसाठी भोजन आणि त्यानंतर विधानसभेत फोटोसेशन आयोजित करण्याची इच्छा आहे, तसेच २३ आणि २४ जुलैला ते शिवमोगा या त्यांच्या जिल्ह्याला भेट देऊ शकतात. २६ तारखेला पक्षाच्या विधिमंडळ समितीची बैठक आहे. मात्र, त्यापूर्वी २५ जुलैला ते वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोजनासाठी आमंत्रित करू शकतात. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय सूत्रांनुसार पवित्र आषाढ महिना असल्याने १५ ऑगस्टपर्यंत कोणतीही घोषणा करण्याचे येडियुरप्पा यांना टाळायचे आहे, तसेच येडियुरप्पा यांना बदलण्यात येणार असल्याची शक्यताही निकटवर्तीयांनी फेटाळली आहे.
तर दुसरीकडे दिल्लीत असलेल्या कर्नाटकच्या तीन नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याचे संकेत काही सूत्रांनी दिले आहेत. कर्नाटकमध्ये काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. येडियुरप्पा यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून पक्ष नेतृत्वाची भेट घेतली होती.
लिंगायत समाजाचा पाठिंबा
एकीकडे राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू असताना येडियुरप्पा यांना काँग्रेसमधून अनपेक्षितरीत्या पाठिंबा मिळत आहे. भाजपने येडियुरप्पा यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी. अन्यथा पक्षाला लिंगायत समुदायाचा रोष सहन करावा लागेल, असे वक्तव्य माजी मंत्री एम.बी. पाटील यांनी केले. त्यांच्यासोबतच आमदार शामानूर शिवशंकराप्पा यांनीही अशीच भूमिका मांडली. येडियुरप्पा यांनीच कायम राहावे, अशी लिंगायत समाजाची इच्छा आहे, असे ते म्हणाले. याशिवाय लिंगायत समाजातील संतांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.