बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार अखेर कोसळलं. त्यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला. पंधरा आमदारांचे राजीनामे, त्यानंतर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे राजीनामे, सर्वोच्च न्यायालयात झालेले युक्तिवाद अशा एकापाठोपाठ एक घडामोडी घडल्यानंतर अखेर आज कर्नाटकातील राजकीय नाटक संपलं. कर्नाटकच्या विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं ९९ आमदारांनी मतदान केलं. तर १०५ मतं सरकारविरोधात गेली. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला.
चौदा महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला ८० आणि जेडीएसला ३७ जागांवर समाधान मानावं लागलं. २२४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, जेडीएसनं आघाडी केली. त्यासाठी काँग्रेसनं कमी जागा असूनही जेडीएसच्या एच. डी. कुमारस्वामींनी मुख्यमंत्री केलं. मात्र हे सरकार स्थापनेपासूनच अस्थिर होतं.भाजपाकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस, जेडीएसनं अनेकदा केला. आघाडी सरकार चालवताना कुमारस्वामी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खटकेदेखील उडाले. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी राजीनामा दिला. या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई गाठली. या सगळ्या घडामोडींच्या मागे भाजपाच असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करता आलं नाही.