बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी कर्नाटक दाखल झाले आहेत. या प्रचारसभेत राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. दलितांवरील अत्याचारावर मोदी गप्प का आहेत ?, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकातल्या जनआशीर्वाद यात्रेत राहुल गांधी बोलत होते. रोहित वेमुलाची हत्या होते. गुजरातमध्ये दलितांना मारहाण होते. अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द केली जाते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या झोपाळ्याला झोका देतात. त्यांची 56 इंचांची छाती आहे. परंतु आता चीन भारताच्या हद्दीत घुसून वारंवार डोकलाम स्वतःच्याच देशाचा भाग असल्याचं दाखवत आहेत. तरीही त्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही. त्यांनी देशाच्या बँकिंग सिस्टमचा बट्ट्याबोळ केला आहे. नीरव मोदी आणि विजय माल्या ज्याला पाहावं तो बँकेला चुना लावून जातो आहे. परंतु मोदी साहेब काहीच करत नाहीयेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.राहुल गांधींनी यावेळी अमित शाहांवरही निशाणा साधला आहे. अमित शाहांनीच येडियुरप्पा सरकारला सर्वाधिक भ्रष्टाचारी म्हटलं आहे. ते पहिल्यांदाच खरं बोलले आहेत. यावेळी राहुल गांधींनी सिद्धरामय्या सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे. कर्नाटकात गरिबातल्या गरीब व्यक्तीचं पोट भरू शकतं. तर मुलींना मोफत शिक्षण प्राप्त होतं. परंतु देशात या उलट परिस्थिती आहे. देशात गरिबांना हलाखीचं जीवन जगावं लागतं आहे. राहुल गांधींनी यावेळी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
दलितांवरच्या अत्याचारावर मोदी अवाक्षरही काढत नाहीत- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 6:12 PM