बागलकोट : कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली तर राज्यात घराणेशाहीचे राजकारण चरमबिंदूवर पोहोचेल आणि दक्षिणेकडचे हे राज्य दंगलींमध्ये होरपळून निघेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी येथे केला. काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास विकासाचा रिव्हर्स गिअर पडेल, असेही ते म्हणाले.
केवळ भाजपच राज्याला न्यू कर्नाटक बनवू शकतो, असे सांगत त्यांनी कर्नाटकातील जनतेला ‘राजकीय स्थिरतेसाठी’ मतदान करण्याचे आवाहन केले. शाह म्हणाले, ‘काँग्रेस जर चुकून सत्तेवर आली तर भ्रष्टाचार शिगेला पोहोचेल आणि लांगूलचालनाचा बोलबाला राहील. शाह कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत जाहीर सभा, रोड शो घेण्यासह आढावा बैठकांत सहभागी होत आहेत.
‘काँग्रेसने लिंगायतांचा अपमान केला’“काँग्रेसने लिंगायत समाजाचा नेहमीच अपमान केला आहे. एवढी वर्षे राज्यात सत्ता असताना ते एस. निजलिंगप्पा व वीरेंद्र पाटील हे दोनच लिंगायत मुख्यमंत्री देऊ शकले व या दोघांचीही अपमान करून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भाजपमधून आलेल्या नेत्यांच्या जोरावर मते मागत असल्याने काँग्रेस किती दिवाळखोर बनली आहे हे दिसून येते, असेही ते म्हणाले.