बंगळुरू : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद सुरु आहे. यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक सीमा भागातील प्रश्नावरही बेधडक मत व्यक्त करत कर्नाटक सरकारला ठणकावले. यावेळी सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र हे साध्य करील. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, असे अजित पवार यांनी म्हटले. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका स्पष्ट आहे आणि राज्य कोणत्याही प्रकारे झुकणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, त्यांनाही (महाराष्ट्राला) हे माहित आहे. मी महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती करतो की, त्यांनी आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी भाषा किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. याचबरोबर, कर्नाटक राज्य आपली एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाषेचा मुद्दा नौटंकी किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहन केले. यासोबतच अनेक कन्नड भाषिक महाराष्ट्रात आहेत, त्यांचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याआधी विधानसभेतही बसवराज बोम्मई म्हणाले होते की, कर्नाटकची एक इंचही सीमा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. जर महाराष्ट्रातील काही भाग कर्नाटक राज्यात सामील करायचा असेल आणि त्यासंदर्भात ठराव मंजूर झाला असेल तर आमचे सरकार त्यासाठी तयार आहे. याशिवाय,सीमाप्रश्नावर महाजन अहवाल अंतिम असल्याची सरकारची स्पष्ट भूमिका आहे, तरीही काही व्यक्ती आणि संघटना वारंवार शांतता बिघडवत आहेत आणि हे निषेधार्ह आहे. हे सभागृह एकमताने अशा कृत्यांचा निषेध करते आणि त्यात गुंतलेल्या गैरकृत्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेते. कर्नाटक सरकारला दोन्ही राज्यांमध्ये (महाराष्ट्रासह) सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते.