प्रकाश बेळगोजीबेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे बेळगावातील हिवाळी अधिवेशन निर्धारित मूळ वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच समाप्त केले जात आहे. गेल्या १९ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनाची ३० डिसेंबर ऐवजी आज गुरुवारी (दि.२९) सांगता होत आहे.सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी काल गुरुवारी ही घोषणा केली. उद्या शुक्रवारी सभागृहातील बहुतांश सदस्यांची प्रतिबद्धता असल्यामुळे त्यांचे कार्यक्रम ठरले असल्यामुळे एक दिवस आधी अधिवेशन समाप्त होत असल्याचे कागेरी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष त्यांचे प्रमुख रणनीतीकार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे, तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे उभयता उद्याच विजयपुरा येथून सुरू होणाऱ्या एकात्मतेचा संदेश देणाऱ्या बस यात्रेचा शुभारंभ करून त्या यात्रेत सहभागी होणार आहेत.
दुसरा विरोधी पक्ष असलेल्या जनता दलाचा बेळगावातील हिवाळी अधिवेशनात किमान सहभाग होता. कारण त्यांचे मुख्य नेते एच. डी. कुमारस्वामी इतर पक्षांच्या नेत्यांबरोबर पंचरत्न यात्रा या आपल्या पक्षाच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याचेच विचार डोक्यात असल्यामुळे सर्व राजकीय संलग्नतेवर आमदारांनी दाखवलेली अनास्था हे या हिवाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. खुद्द सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी देखील बऱ्याच मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरी बद्दल नाराजी व्यक्त केली होती. या खेरीज सभागृहातील वादविवाद प्रसंगी अनेक आमदारांचा विरळ सहभाग दिसत होता.
विधानसभा निवडणूक अवघ्या 100 दिवसांवर असताना बेळगावमध्ये वास्तव्य करावे लागत असल्यामुळे आपल्या निवडणूक तयारीत अडथळा निर्माण झाल्या असल्याची प्रतिक्रियाही बहुतांश आमदारांनी व्यक्त केली होती.