बेंगळुरू : भारतीय जनता पार्टीचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष येडियुरप्पा यांनी केलेल्या पक्षांतर्गत नेमणुकांमुळे पक्षामध्ये प्रचंड नाराजी असून, माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि त्यांच्या समर्थकांनी या नेमणुकांनाच आव्हान दिले आहे; शिवाय माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार नियुक्त्यांविषयी जाहीरपणे बोलत नसले तरी तेही येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर अतिशय नाराज असल्याची चर्चा आहे.मात्र येडियुरप्पा यांनी या नाराजांना शांत करण्याऐवजी अशा प्रकारे बंड करू पाहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि ती करताना संबंधित व्यक्ती किती मोठी आहे, हेही लक्षात घेतले जाणार नाही, अशी जणू धमकीच त्यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी नियुक्त्या एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने केल्या असून, त्या रद्द करण्यात याव्यात, अशी के. एस. ईश्वरप्पा यांची मागणी आहे. मान्य ती मान्य करण्यास येडियुरप्पा तयार नसल्याने भाजपाचे केंद्रीय नेते या प्रकरणात लक्ष घालण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर ईश्वरप्पा आणि त्यांच्या समर्थकांनी बहिष्कार घातला होता. त्यांच्या अनुपस्थितीत व त्यांचे थेट नाव न घेता, नेता कितीही मोठा असला तरी त्याला आपण माफ करणार नाही, असे येडियुरप्पा म्हणाले. या बैठकीला केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा व सिद्धेश्वर, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टार उपस्थित होते. या बैठकीला न आलेले ईश्वरप्पा म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजीच आपण व्यक्त करीत आहोत. पक्षाच्या हितासाठीच आपण प्रयत्न करीत राहू. (वृत्तसंस्था)रुद्रावतार बैठकीतील येडियुरप्पा यांचा रुद्रावतार पाहून कोणीही नेता वा पदाधिकाऱ्याने काहीही बोलण्याचे टाळले, असे कळते. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांनी पक्षवाढीसाठी आपणास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.
कर्नाटक भाजपामध्ये लाथाळ्यांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2016 1:23 AM