Karnataka: 'पैसे नको न्याय द्या', माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर महिलेने फेकले 2 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:51 PM2022-07-15T19:51:45+5:302022-07-15T19:52:51+5:30
Karnataka: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या कारवर एका महिलेने नुकसानभरपाईचे 2 लाख रुपये फेकले.
बंगळुरू: कर्नाटकातील केरूर हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या (siddaramaiah) यांच्या कारवर पीडित कुटुंबातील एका सदस्याने नुकसानभरपाईचे 2 लाख रुपये फेकल्याची घटना घडली. इतके दिवस उलटूनही नेते भेटायला न आल्याने जखमींचे नातेवाईक संतापले. सिद्धरामय्या गाडीतून जात असताना कुटुंबीयांनी गोंधळ घातला आणि पैसे फेकले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही 2 लाखांची रक्कम माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच भरपाई म्हणून दिली होती. मात्र संतप्त नातेवाईकांकडून पैसे फेकून ही रक्कम परत करण्यात आली. काँग्रेस नेत्याने केरूर हिंसाचारात जखमी झालेल्यांना 2 लाख रुपयांची भरपाई दिली होती. मात्र संतप्त कुटुंबाने पैशाची नव्हे तर शांतता आणि उत्तम कायदा व सुव्यवस्था हवी, तसेच हिंसाचारातील दोषींना पकडले पाहिजे, अशी मागणी केली.
#Karnataka -Compensation money which was given by @siddaramaiah was thrown back at him by the family of victims. #Siddaramaih gave 2lakh rupees for the injured when visited them.
— Siraj Noorani (@sirajnoorani) July 15, 2022
Their demand is not the money but to maintain law and order situation and arrest the culprits. pic.twitter.com/lsLcylbpXf
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वाहनावर पैसे फेकणाऱ्या महिलेने सांगितले की, आम्हाला पैशाची गरज नाही तर न्याय हवा आहे. शांतता भंग करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. सिद्धरामय्या शुक्रवारी बागलकोट दौऱ्यावर होते. 6 जुलै रोजी केरूर शहरात झालेल्या हिंसाचारातील जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांनी रुग्णालयात पोहोचून त्यांना नुकसान भरपाईची रक्कम सुपूर्द केली. मात्र सिद्धरामय्या रुग्णालयातून परतत असताना जखमींचे नातेवाईक नुकसानभरपाईचे पैसे परत करण्यासाठी पोहोचले. सिद्धरामय्या पैसे परत न घेता गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असतानाही एका महिलेने पोलिस एस्कॉर्ट वाहनावर दोन लाख रुपये फेकून आपला संताप व्यक्त केला.