कर्नाटकी सत्तासंघर्ष : कुमारस्वामींनी बोलविली कॅबिनेटची बैठक, बंडखोरांच्या याचिकेवर आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 09:42 AM2019-07-11T09:42:00+5:302019-07-11T09:50:22+5:30
राजीनामे विधानसभाध्यक्षांनी मंजूर करावेत, यासाठी 12 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
बंगळुरु : जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीमाना दिल्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष चिघळला आहे. दरम्यान, यातच 11 ते 14 जुलैपर्यंत विधानसभा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात चार जणांहून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.
याशिवाय, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर, दिलेले राजीनामे विधानसभाध्यक्षांनी मंजूर करावेत, यासाठी 12 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
बुधवारी एका मंत्र्यासह आणखी दोघांनी आमदारकीचे राजीनामे दिल्याने जद (एस)-काँग्रेसचे डळमळीत झालेले सरकार ‘गॅस’वरच गेले. गृहनिर्माणमंत्री एम.बी. टी. नागराज व आमदार के. सुधाकर यांनी काल विधानसभाध्यक्षांकडे राजीनामे दिल्याने सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेल्या आमदारांची संख्या 16 झाली. हे सर्व राजीनामे स्वीकारले गेले तर कुमारस्वामी सरकार स्पष्टपणे अल्पमतात येईल. त्यामुळे कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.
दुसरीकडे, बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात विधानसभाध्यक्ष मुद्दाम टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत भाजपाच्या शिष्टमंडळने राज्यपाल वजुभाई गाला यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती केली.