काँग्रेसने दिलेली गॅरंटी पूर्ण करताना कर्नाटकचा खजिना रिकामा, शिवकुमार म्हणाले, आता योजनांसाठी पैसे नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 09:37 AM2023-07-28T09:37:39+5:302023-07-28T09:38:28+5:30
D.K. Shivkumar: काँग्रेस सरकार यावर्षी अधिक विकासकामं करू शकरणार नाही. कारण पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये दणदणीत विजय मिळवत काँग्रेसनेसरकार स्थापन केले होते. मात्र सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटण्यापूर्वीच आमदारांमध्ये आपल्याच सरकारबाबत नाराजी असल्याचे समोर येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. पण काँग्रेस सरकार यावर्षी अधिक विकासकामं करू शकरणार नाही. कारण पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.
काँग्रेसच्या ११ आमदारांनी मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांना लिहिलेले पत्र चर्चेत आहे. आपण २० मंत्र्यांना मतदारसंघातील विकासकामांबाबत पत्र लिहिले होते. मात्र मंत्र्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, अशी तक्रार या पत्रातून केली होती. तसेच आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, ११ आमदारांनी सिद्धारामैय्या यांना ११ आमदारांनी लिहिलेलं तक्रार पत्र हे बनावट असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडे नव्या विकास योजना सुरू करण्यासाठी कुठलाही नवा पैसा नाही आहे. कारण सरकारने निवडणुकीत दिलेल्या ५ आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पैसे वेगळे ठेवले आहेत, असे शिवकुमार यांनी सांगितले.
शिवकुमार यांनी पुढे सांगितले की, आधीच्या भाजपा सरकारने राज्याला दिवाळखोरीत लोटले आहे. आता त्यांनी केलेल्या चुका सुधारून निवडणुकीत दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्यासाठी निधीची व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्याच्या लोकांसाठी काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी जी पाच आश्वासने दिली होती. त्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला पैसे उभे करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.