भोपाळ - संजय लिला भन्साळी यांचा वादात अडकलेला 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध करण्याच्या नादात करणी सेनेने चुकून त्यांच्या कार्यकर्त्याची कार पेटवून दिली. मध्यप्रदेशात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. कायदा सुव्यवस्था महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी सांगितल्यानुसार, 'करणी सेना आणि इतर काही संघटनांनी पद्मावत चित्रपटाला विरोध करण्याच्या हेतून ज्योती टॉकीजबाहेर आंदोलन आयोजित केलं होतं'. या आंदोलनाला काही वेळाने हिंसक वळण लागले आणि आंदोलनकर्त्यांनी जवळच पार्क असणारी मारुती स्विफ्ट कार पेटवून दिली.
काहीवेळानंतर पेटवण्यात आलेली MP 04 HC 9653 ही कार करणी सेनेचा कार्यकर्ता सुरेंद्र सिंह चौहान याची असल्याचं उघड झालं. सुरेंद्र चौहान ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत असून त्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही. आंदोलनादरम्यान हिंदू जागरण मंचचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी यावेळी भाजपात्या काही नेते आणि मंत्र्यांचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला.
थिएटरबाहेर जवळपास 100 जण जमा झाले होते, ज्यांनी थिएटर मालकाला चित्रपट न दाखवण्याची धमकी दिली होती. जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी डझनहून जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि एमपी नगर पोलीस ठाण्यात नेलं. काही वेळानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले आणि गुन्हा दाखल न करण्याची मागणी केली. गाडीमालकाची कोणतीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली.
याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चित्रपटावर बंदी आणत असल्याचं जाहीर केलं होतं. पण सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही चित्रपटावर बंदी आणू शकत नसल्याचं सांगितलं.