नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाविरोधात देशभरात हिंसक निदर्शनं सुरू आहेत. बुधवारीदेखील (24 जानेवारी) करणी सेनेनं ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करत गोंधळ घातला. लज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. या प्रकरणी 18 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
गुरुग्राममधील या शाळेच्या बसवर दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला होता. यावेळी बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला. मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान,लहान मुलं आणि महिलांवरील करणी सेनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला मोदी सरकार कधीच सहन करणार नाही, असे सध्या दावोसमध्ये असलेले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ठणकावून सांगितले आहे. या व्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. सोबत त्यांनी भाजपावर देखील हल्लाबोल चढवला. कोणत्याही परिस्थितीत लहान मुलांविरोधात झालेला हिंसाचार कधीही योग्य ठरवला जाऊ शकत नाही. हिंसा आणि राग हे कमकुवत लोकांचं हत्यार आहे. भाजपा देशभरात आग पसरवण्यासाठी हिंसा व द्वेषाचा वापर करत आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
‘पद्मावत’विरोध झाला हिंसक, करणी सेनेचे ठिकठिकाणी आंदोलनवादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ला राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणा-या चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, असे म्हटले. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आमचे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व गोवामधील सदस्य ‘पद्मावत’चे प्रदर्शन करणार नाहीत, असे जाहीर केले. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीजवळ अनेक ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग बुधवारी तात्पुरते अडवून ठेवले होते, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. इतर ठिकाणी निदर्शकांनी बस व चित्रपटगृहांची नासधूस केली, त्यामुळे चित्रपटगृहमालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
‘पद्मावत’ २५ जानेवारीला प्रदर्शित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर मंगळवारी अहमदाबादेत करणी सेनेने मेणबत्ती मोर्चा काढला. त्यानंतर लगेचच हिंसाचार व जाळपोळ झाली. अहमदाबादेतील अॅक्रोपोलीस, अहमदाबाद वन, हिमालय मॉल आणि सिनेमॅक्सवर हल्ले झाले. विशेष म्हणजे, या चित्रपटगृहाच्या मालकांनी आम्ही ‘पद्मावत’ दाखवणार नाही, असे जाहीर केले होते.गुरगाव येथील आयनॉक्स चित्रपटगृहाला सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबईला जोडणा-या आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनजवळील किशनगंज (जिल्हा इंदूर) भागात पिगदांबर क्रॉसिंग जवळपास २०० निदर्शकांनी अडवून ठेवली होती व त्यांनी काचेच्या बाटल्या तेथे फोडून टाकल्या.
जम्मूत थिएटर पेटवण्याचा प्रयत्न-जम्मूमध्ये निदर्शकांनी चित्रपटगृहाला पेटवून द्यायचा प्रयत्न केला. राजस्थानात चित्तोडगढनजीक बुधवारी सलग दुसºया दिवशी निदर्शने झाली. मथुरा-आग्रा रेल्वेमार्ग भुटेश्वर स्थानकात राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी बुधवारी जवळपास दहा मिनिटे अडवून ठेवला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आमच्या राज्यात पद्मावत प्रदर्शित झाल्यास आनंद वाटेल, असे म्हटले.