नवी दिल्ली: केंद्र सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर 17 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्विट करून म्हटले की, 'एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा फायदा मोठ्या संख्येने शीख यात्रेकरुंना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर उद्यापासून म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोदी सरकारचा श्रीगुरुनानक देवजी आणि आपल्या शीख समुदायाप्रती असलेला अपार आदर दर्शवतो.
कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये करतारपूर साहिब गुरुद्वाराची यात्रा स्थगित करण्यात आली होती. पंजाबमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना गुरुपूरपूर्वी करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. भाजपच्या पंजाब युनिटच्या अध्यक्षा अश्विनी शर्मा यांनी सांगितले की, 11 राज्यांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना गुरु नानक देवजींच्या अनुयायांच्या भावनांची माहिती दिली. यानंतर सरकारने करतारपूर कॉरिडोअर सुरू करण्यास परवानगी दिली.
पाकिस्तानने कॉरिडॉर उघडण्याची विनंती केली होतीदरम्यान, पाकिस्तानने मंगळवारी भारताला करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडण्याची आणि शीख यात्रेकरूंना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सवासाठी पवित्र स्थळाला भेट देण्याची विनंती केली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले होते की, "भारताने अद्याप आपल्या बाजूने कॉरिडॉर उघडला नाही. आम्ही भारत आणि जगभरातील भाविकांचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत." आता भारताकडून करतारपूर कॉरिडॉर सुरू करण्यात आल्याने सर्व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
19 नोव्हेंबर रोजी गुरुपर्व साजरा होणार
पाकिस्तानकडून करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या भारतातील यात्रेकरूंना व्हिसा मुक्त प्रवेश दिला जातो. हा गुरुद्वारा करतारपूर साहिब शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे अंतिम विश्रामस्थान आहे. गुरु नानक यांची जयंती म्हणून साजरे होणारे गुरुपर्व यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. गुरुद्वारा करतारपूर साहिब हे शीख धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाणी पुन्हा उघडणे हा पंजाबसाठी भावनिक मुद्दा आहे.