महाराष्ट्र कॅडरच्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. मात्र या सर्व घटना घडामोडीत यूपीएससीच्या आणखी एका कँडिडेटचे नाव चर्चेत आले आहे. या कँडिडेटचे नाव आहे कार्तिक कंसल, ते इस्रोमध्ये सायंटिस्ट आहेत. कार्तिक यांनी चार वेळा यूपीएससी परीक्षा क्लियर करूनही त्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही सर्व्हिसमध्ये जागा मिळालेली नाही.
इस्रो सायंटिस्ट कार्तिक कंसल यांनी स्टोरी अत्यंत मोटीवेशनल आहे. कार्तिक कंसल हे डिसॅबिलिटीच्या PwBD-1 श्रेणीत येतात. ते मुळचे उत्तराखंडमधील रुडकी येथील आहेत. कार्तिक यांना मस्कुलर डिस्ट्रॉफीचा त्रास आहे. या आजारात काळानुसार स्नायू कमकुवत होऊ लागतात. ते वयाच्या १४ व्या वर्षापासून व्हीलचेअरवर आहे.
कार्तिक कंसल यांची थोडक्यात ओळख? -कार्तिक कंसल यांनी आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. ते सध्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. ऑल इंडिया सेंट्रल रिक्रूटमेंटच्या माध्यमाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत त्यांची निवड झाली आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांना मस्क्यूलर डिस्ट्रोफीचे निदान झाले. यामुळे ते वयाच्या १४व्या वर्षापासूनच व्हीलचेअरचा वापर करत आहेत. हा आजार अनुवांशिक असल्याचे सांगितले जात असून त्यावर उपचार नाही.
यूपीएससी परीक्षेत 4 वेळा यशस्वी -यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे, कार्तिक कंसल यांनी या परीक्षेत तब्बल चारवेळ यश संपादन केले आहे. यावरूनच त्यांच्या बुद्धीमत्तेचा अंदाज येऊ शकतो. त्यांनी 2019 (रँक 813), 2021 (रँक 271), 2022 (रँक 784) आणि 2023 ( रँक 829) मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत यश मिळवले आहे.
कुठल्याही सेवेसाठी का नाही झाली निवड? -कार्तिक कंसल यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रात ते ६०% अपंग असल्याचे नमूद केले होते. मात्र, एम्स बोर्डाच्या तपासात ९०% अपंगत्व असल्याचे आढळून आले. संघ लोक सेवा आयोगाने मस्कुलर डिस्ट्रॉफी हा आजार भारतीय महसूल सेवा (आयकर) ग्रूप A आणि भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क) साठी पात्र उमेदवारांच्या सेवा शर्तींत समाविष्ट केला होता. कार्तिक कंसल यांनी आपल्या प्राधान्य सूचीमध्ये या सेवांची निवड केली होती. मात्र तरीही त्यांना नियुक्ती मिळाली नाही.
जागा असूनही निवड नाही -कार्तिक कंसल यांना 2019 मध्ये 813 व्या रँकसह सेवा दिली जाऊ शकत होती. त्या वर्षी लोकोमोटर डिसॅबिलिटी अंतर्गत 15 जागा रिक्त होत्या, त्यांपैकी 14 पदे भरण्यात आली. यानंतर 2021 मध्ये लोकोमोटर अपंगत्व श्रेणीतील 7 पैकी केवळ 4 पदे भरण्यात आली. या कॅटेगिरीमध्ये कार्तिक कंसल पहिल्या क्रमांकावर होते. मात्र तरीही त्यांची निवड झाली नाही. 2021 मध्ये, त्याचा रँक सर्वोत्कृष्ट आणि IAS पदासाठीही पात्र होता, मात्र तेव्हा UPSC ने IAS साठी पात्र उमेदवारांच्या सेवा शर्तींत मस्क्यूलर डिस्ट्रॉफीचा समावेश केला नाही.
कॅटमध्ये केस पेंडिंग -कार्तिक कंसल सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलमध्ये (CAT) आपली केस लढत आहेत. 2021 पासून त्यांच्या UPSC रिझल्टच्या आधारे हे प्रकरण कॅटमध्ये पेंडिंग आहे. यूपीएससी नोटिफिकेशन 2021 नुसार, अपंगत्वाचे निकष कार्यात्मक वर्गीकरण आणि शारीरिक आवश्यकता, या दोन गोष्टींवर आधारित आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेवेळी, DoPT मध्ये कार्तिक यांना सांगण्यात आले की, त्यांचे कार्यात्मक वर्गिकरण आणि शारीरिक आवश्यकता, त्यांनी ज्या सेवांसाठी अर्ज केला होता, त्या सेवांच्या आवश्यकते प्रमाणे नाहीत.