पाटणा: बिहारमध्येनितीश कुमार यांनी आपली भूमिका बदलत 'राजद'सोबत सत्ता स्थापन केली. काल म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी नवीन बिहार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, यात 31 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये आरजेडीचे कार्तिकेय सिंह यांना कायदा मंत्री बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, बिहारच्या कायदा मंत्र्यावरच एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
राजद आमदार आणि आता बिहारचे कायदा मंत्री कार्तिकेय सिंह यांच्या विरोधात 16 ऑगस्ट रोजी न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. कार्तिकेय सिंह यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे, त्यासाठी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. परंतु त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण न करता 16 ऑगस्ट रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
असे आहे नितीश कुमारांचे मंत्रिमंडळनितीश मंत्रिमंडळात आरजेडीचे 16, जेडीयूचे 11, काँग्रेसचे 2, एचएएमचे एक आणि एक अपक्ष आमदार सामील झाले आहेत. यामध्ये तेज प्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्र प्रसाद यादव, रामानंद यादव, कुमार सर्वजीत, ललित यादव, समीर कुमार, चंद्रशेखर, जितेंद्र कुमार राय, अनिता देवी, सुधाकर सिंग, इस्रायल मन्सूरी, सुरेंद्र राम, कार्तिकेय सिंग, शाहनवाज आलम, सुरेंद्र सिंहसह इतरांचा समावेश आहे.