नवी दिल्लीः कर्नाटकमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस-जेडीएस यांच्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला असताना 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' जोरात सुरू आहेच, पण आज तिथे 'बर्थ डे पॉलिटिक्स'ही पाहायला मिळालं. जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे सर्वेसर्वा, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांची माफी मागितली. या शुभेच्छा आणि माफीनाम्याकडे राजकारणाचा, मोर्चेबांधणीचा भाग म्हणूनही पाहिलं जातंय.
एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरामय आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी केलं आणि काहींच्या भुवया उंचावल्या. 'अचानक कसे काय देवेगौडा आठवले?, याआधी तर कधी मोदींना त्यांना शुभेच्छा दिल्या नव्हत्या', अशा मार्मिक प्रतिक्रिया ट्विपल्सनी व्यक्त केल्या.
त्यानंतर थोड्याच वेळात राहुल गांधींचं ट्विट पडलं. कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं जेडीएसच्या हातात हात दिलाय. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये 'मन की बात' होणं गरजेचंच होतं. त्यानुसारच, साधारण १० मिनिटं राहुल आणि देवेगौडा यांच्यात बातचीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. राहुल यांनी देवेगौडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच, पण प्रचारादरम्यान त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफीही मागितली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र लढाई लढण्याचा निर्धारही त्यांनी केल्याचं कळतं.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं सत्तास्थापनेसाठी राजकारण चांगलंच तापलंय. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसतानाही, राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेचं आमंत्रण दिल्यानं भाजपा वि. काँग्रेस-जेडीएस यांच्यात खडाजंगी सुरू आहे. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतलीय आणि बहुमत सिद्ध करण्याचा विश्वासही व्यक्त केलाय. त्यामुळे आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी काँग्रेस-जेडीएसनं त्यांना हैदराबादमधील रिसॉर्टवर नेऊन ठेवलंय.
दुसरीकडे, भाजपाविरोधात काँग्रेस-जेडीएसनं पुकारलेल्या कायदेशीर लढ्याला यश आलंय. येडियुरप्पा यांनी उद्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्यपालांनी त्यांना १५ दिववसांची मुदत दिली होती. ती विशेष खंडपीठाने रद्द केली आहे. त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्यात.