मुंबई - तामिळनाडूतील डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी मंगळवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या आणि विशेषत: दक्षिण भारतातील राजकारणात त्यांनी मोठे योगदान दिले. एक पटकथा लेखक म्हणून करुणानिधी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सामाजिक आणि बुद्धीजीवींच्या डोक्याला चालना देणारे लेखन करुणानिधी यांनी केले. त्यामुळे कमी काळात ते तामिळनाडूच्या राजकीय आणि चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धीस आले. करुणानिधी हे लेखक, पत्रकार, पटकथालेख, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणीही होते. त्यामुळेच विविध कलागुणांनी निपूण असल्यानेच त्यांना कलैगनार असे संबोधले जात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही करुणानिधींच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करताना, देशाने मास लिडर गमावल्याचे म्हटले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या भाषिक अस्मितेचा आदर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच एक उत्कृष्ट वक्त, पटकथालेखक आणि नेत्याला देश मुकल्याचे राज यांनी म्हटले. करुणानिधी हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते, राजकारणासह इतरही क्षेत्रात त्यांचा दबदबा आणि मोलाचे कार्य होते. लेखक, पत्रकार, पटकथालेखक, कार्टुनिस्ट, उत्तम वक्ता, धुरंदर राजकारणी अशी कित्येक बिरूदावली त्यांच्या नावापुढे लागली जात. त्यामुळेच तमिळ जनतेने त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना कलैगार ही पदवी दिली होती. कलैगार शब्दाचा अर्थ कलेचा विद्वान असा होतो. तसेच मुथामिझ कविनार या नावानेही त्यांचा आदर केला जात. करुणानिधी हे वयाच्या 94 व्या वर्षापर्यंत राजकारणात सक्रीय होते, ही त्यांच्या राजकारणातील सर्वात जमेची बाजू आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही पत्रकार, कार्टुनिस्ट, प्रभावी वक्ते आणि धुरंदर राजकारणी होते. तर अनेक क्षेत्रांची आवड बाळासाहेबांना होती. त्यामुळे बाळासाहेबांची गणनाही अष्टपैलू व्यक्तीमत्वामध्ये होत. देशाच्या राजकारणात मोजक्याच नेते आहेत, ज्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याने दबदबा निर्माण केला होता. त्यामध्ये करुणानिधींची नाव अग्रस्थानी आहे.