नवी दिल्ली - तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन झाले. वयाच्या 94व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, रजनीकांत यांनी करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
करुणानिधी यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अतिशय दु:ख झाले आहे. करुणानिधी एक सदृश वारसा सोडून जात आहेत. सार्वजनिक जीवनात अशी संपत्ती कमी मिळते. करुणानिधी यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.करुणानिधी हे भारताचे ज्येष्ठ नेते होते, त्यामुळे आपण एका मोठ्या नेत्याला, विचारवंताला, लेखकाला आणि समाजासाठी आपले जीवन वाहून घेतलेल्या बाहुबली नेत्याला गमावल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. करुणानिधींच्या मृत्युमुळे मला अतिशय दु:ख झाल्याचे म्हणत मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.करुणानिधी वरिष्ठ नेते होते. तमिळनाडूच्या राजकारणाला त्यांनी वेगळ वळण दिल. लोकप्रिय असे नेतृत्व होतं. अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या. सामाजिक सुधार हा त्यांचा नेहमीच एजेंडा राहिला. ते एक सिद्धहस्त लेखक आणि वक्ते होते. भारताच्या राजकारणात केंद्रातील सत्तेला ज्यांची नेहमीच दखल घ्यावी लागायची असे ते नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही करुणानिधींच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच एका मोठ्या तत्ववेत्त्याला आणि लेखकाला देश मुकल्याचे शिंदे यांनी म्हटले. माझ्या आयुष्यातील आज सर्वात काळा दिवस असून मी आज काय गमावलयं हे मी कधीही विसरू शकत नसल्याची भावनात्मक प्रतिक्रिया दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिली. तसेच मी त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही ते म्हणाले.
भारतीय राजकाणातील मास लिडर असलेल्या करुणानिधींच्या निधनामुळे दु:ख झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचेही पवार यांनी म्हटले.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडून श्रद्धांजली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून शोक व्यक्त
राज ठाकरेंकडून श्रद्धांजली