चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर आज मरिना बीचवर त्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली.
करुणीनिधींचे पार्थिव मरीना बीचवर ठेवण्यात आले आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत. लष्करी जवानांकडून त्यांना सलामी देण्यात आली असून त्यांचा दफनविधी होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, प्रियंका वाड्रा, चंद्राबाबू नायडू यांसह दिग्गज राजकीय नेत्यांनी करुणानिधींचे अत्यंदर्शन घेतले.
करुणानिधींच्या दर्शनस्थळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत. सध्या पोलिस आणि समर्थकांकडून गर्दीला पांगविण्यात येत आहे.