चेन्नई- तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे काल चेन्नई येथे निधन झाले. गेली पन्नास वर्षे ते तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011 असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते.करुणानिधी यांच्या कुटुंबाचा विस्तार मोठा असून त्यांचे स्टॅलिन यांच्यासह अनेक वारसदार आहेत. करुणानिधी यांचा तीनवेळा विवाह झाला. पद्मावती, दयालू आणि रजती अशी त्यांच्या सहचारिणींची नावे आहेत. त्यांना चार मुलगे आहेत.एमके मुथु, एमके अळगिरी, एमके स्टॅलिन आणि एमके तमिळरासू अशी त्यांची नावे आहेत तर एमके सेल्वी, एमके कनिमोळी अशा दोन मुली त्यांना आहेत. त्यांच्या प्रथम पत्नी पद्मावती यांच्यापासून त्यांना एमकेमुथु हे पूत्र आहेत. तर दयाळू यांच्यापासून त्यांना अळगिरी, स्टॅलिन, सेल्वी, तमिळरासू अशी अपत्ये झाली. तर तिसरी पत्नी रजती यांच्यापासून कनिमोळी या कन्या आहेत. पद्मावती यांच्यानिधनानंतर त्यांनी दयाळूअम्मल यांच्याशी विवाह केला.
स्टॅलिन आणि अळगिरी यांनी राजकीय नेतेपदं स्वीकारली मात्र तमिळरासू यांनी राजकारणात प्रवेश केलाच नाही.करुणानिधी यांचे भाचे मुरासोली मारनसुद्धा द्रमुकचे एक महत्त्वाचे नेते होते. मुरासोली मारन 36 वर्षे संसद सदस्य होते. व्ही. पी. सिंग, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी या चार पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये ते केंद्रात मंत्री होते. त्यांना कलानिधी व दयानिधी असे पूत्र आहेत. मारन यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा दयानिधी चालवत आहेत.एमके मुथू- हे अभिनेते, गायक आणि राजकारणी आहेत. पिल्लायो पिल्लाई, सम्यलकरण, अनयाविलाकू, पूकेरी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले तसेच त्यांनी सिनेगीतं त्यांनी गायली आहेत.एमके स्टॅलिन- द्रमुकचे सध्याचे कार्याध्यक्ष असून ते चेन्नईचे 37 वे महापौर होते. तामिळनाडूचे पहिले उपमुख्यमंत्री होते.एमके अळगिरी- अळगिरी यांनी मदुराईमधून द्रमुकचे काम करायला सुरुवात केली. संपुआ सरकारच्या काळात ते केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मात्र स्टॅलिन व अळगिरी समर्थकांमध्ये नेहमीच तणावाचे संबंध राहिले आहेत.एमके तमिळरासू- हे उद्योजक असून पक्षाने जेव्हा जेव्हा विनंती केली तेव्हा त्यांनी पक्षासाठी प्रचाराचे काम केले आहे.