नवी दिल्ली : ‘अजमल कसाबसारख्या दहशतवाद्यालाही आपल्या देशात नि:पक्ष सुनावणीची संधी मिळाली होती,’ अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केली.
जम्मू-काश्मीरचा फुटीरवादी नेता यासिन मलिक याच्याविरुद्धच्या खटल्यात सुनावणीदरम्यान ही टिपणी करत न्यायालयाने तिहार तुरुंगात मलिक याच्याविरुद्ध सुनावणीकरिता एक न्यायालयीन कक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले. याबाबतची पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होईल.
८ डिसेंबर १९८९ रोजीच्या तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या रुबिया सईद अपहरण प्रकरणात आरोपी व साक्षीदारांना प्रत्यक्ष हजर करण्याचे निर्देश जम्मू न्यायालयाने दिले होते.
मात्र, या प्रकरणात आरोपी असलेल्या मलिकला तिहार तुरुंगातून जम्मू येथे हलवणे कठीण असल्याचे सीबीआयच्या वतीने उपस्थित महाधिवक्ता तुषार मेहता यांनी स्पष्ट केले होते.