पाटणा- उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी तिरंगा यात्रेदरम्यान दोन गटात झालेल्या वादानंतर आजसुद्धा शहरात तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाने दोन बस पेटविल्या. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी केली आहे. तसंच शहरात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली.
शुक्रवारी अभिषेक ऊर्फ चंदन गुप्ता या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारादरम्यान वाद निर्माण झाला होता. चितेला अग्नी दिल्यानंतरही लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता. दरम्यान, खासदार राजवीर सिंह यांनी संबंधीत समाजाच्या नेत्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणे करुन दिल्यानंतर या तरुणावर अत्यंसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारानंतर परतताना जमावाने परिसरातील दुकानं पेटवायला सुरुवात केली. रस्त्यातील भाज्यांच्या गाड्याही त्यांनी पलटी केल्या. दुकानांची तोडफोड केली तसंच दोन बसही पेटविल्या.
नेमकं प्रकरण काय ?शुक्रवारी कासगंज शहरात एका समाजाकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. तिरंगा यात्रा बड्डूनगर इथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या समाजाच्या एका गटासोबत त्यांचा वाद झाला. दरम्यान, बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. यामध्ये यात्रा काढलेल्या समाजाचा तरुण चंदन गुप्ता याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर इतर दोन जण जखमी झाले. या घटनेनंतर हिंदूत्ववादी संघटनांनी शहरातील बाजारपेठा बंद पाडल्या. लोकांनी रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध करत दगडफेक केली.