श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (27 जुलै) चकमक झाली. या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती. या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरी आणि त्याच्या एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला आहे. 19 वर्षीय मुन्ना हा पाकिस्तानचा रहिवासी असून आयईडी तयार करण्यात एक्सपर्ट होता. शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
आज पहाटे दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील बोनाबाजार येथे दोन ते दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी परिसराला घेराव घातला. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. त्यांनी जवानांना पाहिल्यानंतर त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन्ही दहशतवादी ठार झाले. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरावर नजर ठेवली आहे. तसेच परिसरातील इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या वाँटेड दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली होती. बसीर अहमद असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं. मिळालेल्या माहितीनुसार, बसीर अहमद याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. बसीरवर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्या विषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली. याआधी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचे साथीदार फैयाज आणि मजीद बाबाला अटक केली होती.