नवी दिल्ली : बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) अटक करण्यात आलेले ‘न्यूजक्लिक’चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांनी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे वादग्रस्त प्रदेश असल्याचा दुष्प्रचार करण्याचे कारस्थान रचले होते, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. याबाबत पुरेसे पुरावे आहेत, असा दावाही केला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पुरकायस्थ, अमेरिकी उद्योगपती नेवेली रॉय सिंघम व त्यांच्याशी संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांत ई-मेलची देवाणघेवाण झाली. त्यातून काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशबाबत दुष्प्रचार करण्याचा त्यांचा डाव उघडा पडला. नकाशात देशाच्या सीमांरेषात छेडछाड करत देशाच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व यांना सुरुंग लावण्याचा हेतू आहे, असेही या अर्जात म्हटले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी पत्रकार अभिसार शर्मा यांना गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. त्यांची मंगळवारीही चौकशी करण्यात आली होती.
एफआयआरची प्रत मागणाऱ्यांना विरोध
पुरकायस्थ, मनुष्यबळ विभागाचे प्रमुख चक्रवर्ती यांच्या एफआयआर प्रतीची मागणी करणाऱ्या अर्जांना पोलिसांनी विरोध केला.
पोलिसांनी एफआयआरची प्रत देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद दोन्ही आरोपींच्या वकिलांनी केला. तो विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी खोडून काढला.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर 'न्यूजक्लिक'प्रकरणी एफआयआरची प्रत देण्याबाबत प्रबीर पुरकायस्थ व अमित चक्रवर्ती यांनी दाखल केलेली याचिका दिल्लीच्या न्यायालयाने मंजूर केली. एफआयरची प्रत देण्याचे आदेश पोलिसांना दिले.