ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १७ - अवघ्या दोन दिवसांपूर्वी , भारताच्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगर मधल्या नौहट्टामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे कमांडर प्रमोद कुमार शहीद झाले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला असून त्यामध्ये २ जवान व एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.
काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ख्वाजा बाग परिसरातून लष्कराचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ल्या चढवल्याची माहिती मिळाली. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजते. जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
या हल्ल्यात २ जवान व एक पोलीस शहीद झाले असून आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या अशांत परिस्थितीचा फायदा घेऊन गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत.
3 security personnel including 2 Army men killed in a terrorist attack in Baramulla district of J&K— ANI (@ANI_news) August 16, 2016